Advertisement
BREAKING
ताज्या बातम्या लोड होत आहेत...

न्हावा येथील ओएनजीसी कामगारांच्या लढ्याला यश; 'सुखकर्ता' पावला : महेंद्रशेठ घरतखासदार सुनील तटकरे यांची यशस्वी मध्यस्थी : महेंद्रशेठ घरत

न्हावा येथील ओएनजीसी कामगारांच्या लढ्याला यश; 'सुखकर्ता' पावला : महेंद्रशेठ घरत

खासदार सुनील तटकरे यांची यशस्वी 
मध्यस्थी : महेंद्रशेठ घरत 
उलवे, ता. २३ : न्हावा येथील ओएनजीसी कंपनीने १७ कंत्राटी कामगारांना कामावरून अचानक काढले होते. त्यामुळे सुमारे ६०० कामगारांनी बेमुदत संप सुरू केला होता. न्हावा ग्रामस्थ एकजुटीने रस्त्यावर उतरले आणि डॉक अॅण्ड वर्कर युनियनने खमकी भूमिका घेतली होती. त्यामुळे वातावरण तंग होते. मात्र रायगडचे खासदार आणि लोकसभेच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी ओएनजीसीसोबत यशस्वी मध्यस्थी केली. त्यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने रात्री उशिरा ओएनजीसी प्रशासनाने १७ कामगारांना कामावर घेणार असल्याचे कळवले आहे, असे न्हावा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष राजेश घरत यांनी सांगितले. त्यांच्याच पुढाकाराने हा लढा आठवडाभर सुरू होता. बुधवारपासून (ता. २३)काम सुरू झाले आहे. 
सोमवारी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी न्हावा येथे कामगारांशी संवाद साधला होता. कामगारांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनीही तातडीने सूत्रे हलवली. "कामगारांच्या प्रश्नी खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. आंदोलन चिघळेल आणि ओएनजीसीला महागात पडेल, स्थानिक भूमिपुत्र कामगार आहेत, असे तटकरे यांनी प्रशासनाला पटवून दिले," असे महेंद्रशेठ घरत म्हणाले. त्यामुळे ओएनजीसी प्रशासन नमले.
कामगारांच्या यशस्वी लढ्याबाबत बोलताना महेंद्रशेठ घरत पुढे म्हणाले,"न्हावा ग्रामस्थ राजकीय चपला बाजूला ठेवून एक झाले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कामगारांवर आलेले संकट अखेर विघ्नहर्ता गणेशाने दूर केले आहे. त्यामुळे न्हावा ग्रामस्थ, सर्व कामगार, खासदार सुनील तटकरे आणि कामगारांना धीर देण्यासाठी आलेल्या सर्व नेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो."
यावेळी न्हावा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष राजेश घरत म्हणाले, "आम्ही कामगारांच्या भल्यासाठी एकत्र आलो. डॉक अॅण्ड वर्कर युनियनचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे यांनी खमकी भूमिका घेतली. आम्हाला खासदार सुनील तटकरे, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उत्तम साथ दिली." 
हा लढा यशस्वी करण्यासाठी न्हावा सरपंच विजेंद्र म्हात्रे, शैलेश पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, हनुमान भोईर आणि न्हावा ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारी यांनी मोलाची भूमिका निभावली.
Previous Post Next Post