Advertisement
BREAKING
ताज्या बातम्या लोड होत आहेत...

२२ हजार डायमंड्समधून साकारले रामशेठ ठाकूर यांचे आकर्षक चित्र; वैदेही पाटीलच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक

२२ हजार डायमंड्समधून साकारले रामशेठ ठाकूर यांचे आकर्षक चित्र; वैदेही पाटीलच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक
पनवेल : लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भातान येथील कु. वैदेही सुनील पाटील हिने आपल्या कल्पकतेचा, संयमाचा आणि कलाप्रेमाचा अनोखा आविष्कार सादर करत डायमंड पेंटिंगच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर यांचे आकर्षक चित्र साकारून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या या कलाकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले असून सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.

या विशेष कलाकृतीसाठी वैदेहीला तब्बल आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागला. सुमारे २२ हजार सूक्ष्म डायमंड्स एक-एक करून अत्यंत बारकाईने आणि संयमाने चिटकवत तिने रामशेठ ठाकूर यांची देखणी फोटो फ्रेम तयार केली. प्रत्येक डायमंड योग्य ठिकाणी बसवण्यासाठी लागणारी मेहनत, एकाग्रता आणि कलात्मक दृष्टी यामुळे ही कलाकृती विशेष ठरली आहे. या पेंटिंगमधून रामशेठ ठाकूर यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आले आहे.

वैदेहीच्या या आगळ्यावेगळ्या भेटीमुळे रामशेठ ठाकूर भारावून गेले. त्यांनी तिच्या मेहनतीचे आणि कलागुणांचे मनापासून कौतुक करत तिचे अभिनंदन केले. तसेच तिची आपुलकीने विचारपूस करून शिक्षण, छंद आणि भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधला. अशा प्रकारची सर्जनशीलता आणि जिद्द तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

विशेष म्हणजे, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आकर्षणात अनेक तरुण रमलेले असताना वैदेहीने आपल्या कलेच्या माध्यमातून सर्जनशीलतेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या कलाकृतीतून केवळ एक चित्र साकारले गेले नाही, तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावनाही व्यक्त झाली. मेहनत, चिकाटी आणि कलाविष्कार यांचा सुंदर संगम असलेल्या या डायमंड पेंटिंगची उपस्थितांकडून विशेष दखल घेण्यात आली.

वैदेहीने साकारलेली ही डायमंड पेंटिंग वाढदिवसाची एक संस्मरणीय भेट ठरली असून तिच्या या अनोख्या उपक्रमाचे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडूनही कौतुक करण्यात येत आहे. तिच्या या कलात्मक कार्यामुळे भातान गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Previous Post Next Post