चालण्याची क्षमता गमावलेल्या २८ वर्षीय तरुणीला सेल-आधारित उपचारांनी दिली नवी आशा
स्जोग्रेन सिंड्रोमशी संबंधित दुर्मिळ न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीवर स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये यशस्वी उपचार
नवी मुंबई प्रतिनिधी वेध विकासाचा: अनेक वर्षे आजाराचे अचूक निदान न होणे, विविध रुग्णालयांत उपचार घेऊनही प्रकृतीत पाहिजे तशी सुधारणा न होणे आणि हळूहळू चालण्याची क्षमता गमावणे अशा कठीण प्रवासानंतर, स्जोग्रेन सिंड्रोमशी संबंधित गँग्लिओनोपॅथी (Sjögren’s Syndrome-associated Ganglionopathy) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीने त्रस्त असलेल्या २८ वर्षीय तरुणीला सेल बेस आधारित उपचार आणि पुनर्वसनामुळे नव्या आयुष्याची आशा मिळाली आहे.
स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक व रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. प्रदीप महाजन यांच्या नेतृत्वाखालील टीमने या तरुण महिला रुग्णावर तिच्या वैयक्तिक गरजेनुसार उपचार केले. यामुळे तिच्या स्नायूंमधील कडकपणा कमी झाला, हालचालींमध्ये सुधारणा झाली आणि ती आता काठीच्या आधाराने पुन्हा चालू लागली आहे. त्यामुळे तिच्या दैनंदिन जीवनाही लक्षणीय सुधारणा झाली.
कोलकात्यातील रहिवासी तानिया मोडक पाईक यांना २०१८ मध्ये चालताना पाय ओढल्यासारखे वाटू लागले. सुरुवातीला अनेक डॉक्टरांनी कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे सांगत जीवनसत्त्वांच्या गोळ्या दिल्या, ज्यामुळे काही काळ आराम मिळाला. मात्र दोन महिन्यांनंतर डाव्या पायात ताठरपणा जाणवू लागला. २०२२ मध्ये विवाहानंतर उजव्या पायातही अशीच समस्या निर्माण झाली. २०२३ पर्यंत त्यांची प्रकृती अधिकच खालावली. स्नायूंचा कमकुवतपणा, तोल जाणे, पायऱ्या चढता न येणे आणि दैनंदिन कामांसाठी इतरांची मदत घ्यावी लागणे अशा अडचणी निर्माण झाल्या. पुढील तब्बल चार वर्षे रुग्ण व्हीलचेअरवर अवलंबून राहिल्या.
डिसेंबर २०२३ मध्ये बंगळुरूमध्ये करण्यात आलेल्या मसल बायोप्सीमध्ये त्यांना ऑटोइम्यून मायोसायटिसचे निदान झाले. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या स्नायूंवर हल्ला करते. स्टेरॉईड उपचार करूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही.
चार-पाच महिन्यांनंतर त्यांना स्जोग्रेन सिंड्रोमचे निदान झाले. त्यामुळे डोळे आणि तोंड सतत कोरडे पडणे, चव जाणे आणि मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणांचे कारण स्पष्ट झाले. मे २०२४ मध्ये त्यांच्यावर प्लाझ्माफेरेसिस करण्यात आले. त्यानंतर मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपी, रिटुक्सिमॅब इन्फ्युजन आणि इतर औषधोपचारही सुरू ठेवण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न होता त्या पूर्णपणे व्हीलचेअरवर अवलंबून झाल्या. अखेर त्यांनी स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये डॉ. प्रदीप महाजन यांची भेट घेतली.
स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक व रीजनरटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. प्रदीप महाजन म्हणाले, स्जोग्रेन सिंड्रोम हा एक ऑटोइम्यून आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अश्रू आणि लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर हल्ला करते. त्यामुळे डोळे व तोंड कोरडे पडते. काही रुग्णांमध्ये हा आजार मज्जासंस्थेवरही परिणाम करतो आणि गँग्लिओनोपॅथीसारखी गुंतागुंत निर्माण होते. यामुळे संवेदना कमी होणे, तोल जाणे, चालण्यात अडचण येणे, स्नायूंमध्ये कडकपणा येणे, स्नायू कमकुवत होणे आणि त्यांच्यातील समन्वय बिघडणे अशी लक्षणे दिसतात. औषधांनी आजार नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करता येतो; मात्र मज्जासंस्थेची पुनर्बांधणी करणे मात्र आव्हानात्मक असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार आणि दीर्घकालीन पुनर्वसन महत्त्वाचे ठरते.
ते पुढे सांगतात की, स्जोग्रेन सिंड्रोमचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आनुवंशिकता, हार्मोन्समधील बदल आणि विषाणूजन्य संसर्ग यांसारखे पर्यावरणीय घटक या आजारास कारणीभूत ठरू शकतात. शोग्रेन सिंड्रोम आणि ऑटोइम्यून मायोसायटिस हे दोन्ही आजार काही रुग्णांमध्ये एकत्रही आढळू शकतात. त्यामुळे सुरुवातीला निदान करणे कठीण जाते. रक्त तपासण्या, स्कॅन आणि आवश्यक असल्यास मसल बायोप्सीच्या साहाय्याने अचूक निदान करता येते.
डॉ. महाजन म्हणाले, दर हजार लोकांमागे सुमारे १ ते १० जणांना स्जोग्रेन सिंड्रोम असू शकतो. या आजारात लाळ, अश्रू, त्वचा, नाक आणि योनीतील ओलावा निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर परिणाम होतो. तानियासाठी तिच्या न्यूरोलॉजिकल स्थिती, पूर्वीचे उपचार आणि कार्यक्षमतेतील मर्यादा लक्षात घेऊन वैयक्तिक गरजेनुसार उपचार आणि पुनर्वसन कार्यक्रम तयार करण्यात आला. या उपचारामध्ये सेल-आधारित लिव्हिंग ड्रग थेरपी, टार्गेटेड आणि सुपरचार्ज्ड एक्सोसोम्स, माइटोकॉन्ड्रियल थेरपी, फिजिओथेरपी, संरचित पुनर्वसन आणि वैयक्तिक आहार मार्गदर्शनाचा समावेश होता. या उपचार पद्धतीमुळे दाह कमी होणे, रोगप्रतिकारक शक्तीला आधार मिळणे, स्नायूंची बळकटी वाढणे आणि जीवनमान सुधारण्यास मदत झाली.
ते पुढे म्हणाले, उपचार सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत तानियामध्ये सकारात्मक बदल दिसू लागले. हिरड्यांतून होणारा रक्तस्राव कमी झाला, तोंडाचा कोरडेपणा कमी झाला, पाणी न पिता अन्न गिळणे सोपे झाले, सततचा खोकला कमी झाला, पाठदुखी आणि स्नायूंचा ताठरपणा कमी झाला तसेच हालचालींमध्ये सुधारणा झाली. आज त्या खुर्चीवरून स्वतः उठू शकतात, काठीच्या आधाराने काही पावले चालू शकतात. उपचारानंतरही नियमित फिजिओथेरपी आवश्यक आहे. शोग्रेन सिंड्रोमकडे दुर्लक्ष केल्यास मज्जातंतूंचे नुकसान, स्नायूंची कमजोरी, सांधेदुखी तसेच फुफ्फुसे किंवा मूत्रपिंडांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेत निदान आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. नियमित फॉलो-अप, पुरेसे पाणी पिणे, डोळे व तोंडाची योग्य काळजी घेणे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घेणे आवश्यक आहे.
तानिया मोडक पाईक म्हणाल्या, अनेक वर्षे माझ्या आजाराचे अचुक निदान करण्यातच घालवली. चालता येणारी मी हळूहळू आधारावर आणि नंतर व्हीलचेअरवर अवलंबून राहू लागली. तोंडाचा कोरडेपणा, स्नायूंचा कमकुवतपणा , ताठरपणा आणि संवेदना कमी झाल्यामुळे दैनंदिन आयुष्य कठीण झाले होते. स्टेमआरएक्समध्ये उपचार सुरू केल्यानंतर अनेक वर्षांनी सकारात्मक बदल जाणवू लागले. तोंडाचा कोरडेपणा कमी झाला, गिळताना त्रास कमी झाला आणि स्नायूंचा ताठरपणा कमी होऊ लागला. आज मी पुन्हा आधाराने चालू शकते. खुर्चीवरून स्वतः उभे राहणे आणि काही पावले चालणे यामुळे माझा आत्मविश्वास पुन्हा वाढला आहे. डॉ. प्रदीप महाजन आणि त्यांच्या संपूर्ण टीमची मी मनापासून आभारी आहे.