आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सामाजिक आधार
वेध विकासाचा प्रतिनिधी
श्री द्वारकाधीश चॅरिटीज ट्रस्टतर्फे २२५ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य; 'शिक्षण हीच खरी ताकद' असा संदेश
तारा, प्रतिनिधी : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने श्री. द्वारकाधीश चॅरिटीज ट्रस्टने आणखी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला. ट्रस्टच्या वतीने तारा येथील अर्चना ट्रस्ट तसेच बानूबेन प्रवीण शहा आदिवासी वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या सुमारे २२५ आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वसतिगृह परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी अडसर ठरू नयेत, प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ट्रस्टकडून वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अजित कारखानीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "आज तुम्ही घेत असलेले शिक्षणच उद्याचे तुमचे भविष्य घडविणार आहे. मनापासून अभ्यास करा, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. यशस्वी झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांचा अभिमान वाढवा आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजकार्यातही योगदान द्या. शिक्षण हीच माणसाला उंचीवर नेणारी सर्वात मोठी शक्ती आहे."
कार्यक्रमाला सौ. कारखानीस, डॉ. मयुरेश पिंपुटकर, सौ. शमिका पिंपुटकर, दिगंबर गोगटे, ट्रस्टचे समन्वयक श्री. योगेश ताटे, अर्चना ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, संजय म्हात्रे, निलेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.
सामाजिक उत्तरदायित्व जपत शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या श्री. द्वारकाधीश चॅरिटीज ट्रस्टच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भविष्यातही अशाच लोकहितकारी उपक्रमांद्वारे समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा निर्धार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला*