Advertisement
BREAKING
ताज्या बातम्या लोड होत आहेत...

वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला MSF कर्मचाऱ्याने करून दिला मार्ग; सजग नागरिकाकडून विशेष कौतुक

वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला MSF कर्मचाऱ्याने करून दिला मार्ग; सजग नागरिकाकडून विशेष कौतुक
पनवेल : नवीन पनवेल येथील एचडीएफसी सर्कलजवळील उड्डाणपुल परिसरात सायंकाळी सुमारे ६.५८ वाजण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी एका रुग्णवाहिकेला वाहतुकीमुळे पुढे जाता येत नसल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) कर्मचारी श्री. नितीन महांगडे (क्रमांक MSF2526773) यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पुढाकार घेतला.

श्री. महांगडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करत संबंधित रुग्णवाहिकेला सुरक्षित व तात्काळ मार्ग उपलब्ध करून दिला. त्यांच्या या तत्परतेमुळे रुग्णवाहिका वेळेत पुढे जाऊ शकली व रुग्णाला आवश्यक वैद्यकीय उपचार वेळेत मिळण्यास मदत झाली.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत एका सजग नागरिकाने माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवून श्री. नितीन महांगडे यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले आहे. तसेच त्यांच्या या सेवाभावी व कर्तव्यदक्ष कार्याची नोंद प्रशासकीय स्तरावर तसेच त्यांच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी, अशी विनंतीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या घटनेबाबत पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. औदुंबर भा. पाटील यांनी श्री. महांगडे यांचे विशेष कौतुक केले. वाहतूक शाखेच्या अंमलदारांसमवेत कार्यरत असलेले MSF जवान अत्यंत सजगपणे, शिस्तबद्ध पद्धतीने व जबाबदारीची जाणीव ठेवून कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत दाखविलेली तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

श्री. नितीन महांगडे यांच्या या मानवतावादी व कर्तव्यदक्ष कार्याबद्दल नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Previous Post Next Post