Advertisement
BREAKING
ताज्या बातम्या लोड होत आहेत...

कसळखंड ग्रामपंचायतीचा अतिक्रमणाविरोधात दणका; विजय स्टीलला कायदेशीर नोटीस

कसळखंड ग्रामपंचायतीचा अतिक्रमणाविरोधात दणका; विजय स्टीलला कायदेशीर नोटीस

सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप; मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास ग्रामपंचायतीकडून थेट कारवाईचा इशारा
पनवेल प्रतिनिधी वेध विकासाचा पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीने सार्वजनिक जागेवरील कथित अतिक्रमणाविरोधात कठोर भूमिका घेत विजय स्टीलचे मालक विनोदकुमार छबीलदास गोयल यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ग्रुप ग्रामपंचायतीच्या अभिलेखांनुसार तसेच प्रत्यक्ष पाहणीनंतर मौजे कसळखंड येथील सर्व्हे क्रमांक 97/1 परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृत अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 53 अंतर्गत ही नोटीस देण्यात आली असून, संबंधित अतिक्रमण सार्वजनिक हितास बाधक ठरत असल्याने तसेच ग्रामस्थांच्या हक्काच्या वापरात अडथळा निर्माण होत असल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे.

ग्रामपंचायतीने संबंधितांना निर्धारित मुदतीत स्वखर्चाने अतिक्रमण हटवून जागा मूळ स्थितीत आणण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अतिक्रमण काढून टाकल्यानंतर त्याचा लेखी अहवाल ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे.

नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास ग्रामपंचायत कोणतीही पुढील नोटीस न देता थेट अतिक्रमण हटविण्याची कारवाई करेल. यासाठी लागणारा मनुष्यबळ, यंत्रसामग्री, वाहतूक आणि प्रशासकीय खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.

याशिवाय कारवाईमध्ये अडथळा निर्माण झाल्यास किंवा सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर सुरू ठेवल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा प्रस्तावही सक्षम प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता 2023 तसेच इतर लागू कायद्यांनुसार पोलीस प्रशासनामार्फतही कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, कसळखंड ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सदाशिव पोंडीराम लवटे यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस बजावण्यात आली असून सरपंच संजय नारायण घरत यांचीही यास मान्यता असल्याचे समजते.

सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधात ग्रामपंचायतीने घेतलेल्या या भूमिकेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून पुढील कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून नक्की कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Previous Post Next Post