Advertisement
BREAKING
ताज्या बातम्या लोड होत आहेत...

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल काँग्रेसचे समाजाभिमुख उपक्रम‘प्रत्येक घरापर्यंत काँग्रेस’चा डॉ. श्रुती म्हात्रे यांचा निर्धार




पनवेल, दि. १९ जून : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण, केक कापणे तसेच अनाथ व निराधारांना स्नेहभोजन देत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

पनवेल काँग्रेस भवन येथे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती श्याम म्हात्रे यांच्या हस्ते नव्याने उभारलेल्या ध्वजस्तंभावर काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकावण्यात आला. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना डॉ. श्रुती म्हात्रे यांनी पनवेल शहर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याची घोषणा केली. राहुल गांधी यांनी देशभरात जनतेशी थेट संवाद साधत सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा जो मार्ग स्वीकारला आहे, त्याच धर्तीवर पनवेलमध्येही काँग्रेस कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले.

येत्या काळात जिल्हाभर ‘प्रत्येक घरापर्यंत काँग्रेस’ ही मोहीम राबविण्यात येणार असून डोर-टू-डोर भेटींद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या युवक-युवतींना संघटनेत संधी देऊन नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

विविध पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसच्या विचारसरणीकडे आकर्षित होत असून त्यांनाही पक्षात सामावून घेत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शील आश्रम येथे सुमारे ५०० अनाथ मुले आणि निराधार व्यक्तींना स्नेहभोजन देण्यात आले. आश्रमातील मुलांसमवेत केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे आश्रम परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सामाजिक संस्था व नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सातत्याने पुढाकार घेईल, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास डॉ. श्रुती श्याम म्हात्रे, जिशान सिद्दिकी, शशिकला सिंग, चेतन म्हात्रे, प्रितेश साहू, अभिजीत मुंडकल, लतीफ नलकांडे, अजय कापरे, शंभू म्हात्रे, जोश जेम्स, मुनावर देशमुख, अरविंद सोनटक्के, आरती ठाकूर, सोनिया सोहोटा, बबन कांबळे, शैलेश म्हात्रे, एकनाथ ठोंबरे, स्नेहा मोटे, हेमंत खैरे, विशाल घोगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post