पनवेल, दि. १५ (वार्ताहर) वेध विकासाचा
पनवेल, उरण व कर्जत परिसरातील वीज ग्राहकांना गेल्या काही दिवसांत वीज पुरवठा खंडित होण्याच्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात वीज ग्राहकांना दिली जाणारी सेवा ही त्रुटीरहित आणि परिपूर्ण असावी, असे स्पष्ट आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भातील सविस्तर माहिती दिली.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्यासह तालुक्यांतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हाप्रमुख व नगरसेवक रामदास शेवाळे, महानगरप्रमुख व नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण, नगरसेविका सायली सरक, शहरप्रमुख तुकाराम सरक यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना खासदार बारणे यांनी सांगितले की, आगामी काळात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना ठोस उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने: नवीन सबस्टेशन्स: शहरी भागात ४ आणि ग्रामीण भागात ३ अशी एकूण ७ नवीन सबस्टेशन पुढील ३ महिन्यांत उभारण्यात येणार आहेत.
सुरक्षा व आधुनिकीकरण: उघड्या डीपी (DP) बंदिस्त करणे, जुन्या केबल्स बदलणे, अंडरग्राउंड वायरींचे जाळे निर्माण करणे आणि फायबर फिडरचा वापर करणे यावर भर दिला जाईल.
वीज चोरीचे प्रकार थांबवणे आणि 'स्मार्ट मीटर' संदर्भात ग्राहकांमध्ये असलेली भीती किंवा संभ्रम दूर करून त्यांना योग्य ती माहिती देणे.
"ग्राहक हा राजा आहे"
"ग्राहक हा राजा असून त्याला अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा मिळणे हा त्याचा हक्क आहे. महावितरणच्या कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वेळेत उपलब्ध असणे गरजेचे आहे. कुठेही वीज खंडित झाल्यास किंवा दुर्घटना घडल्यास कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून यंत्रणा पूर्ववत करावी."